

माढा : जामगाव (ता. माढा) येथे चोरट्यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून ६१ वर्षीय वृद्धाच्या डोक्यात घातक हत्याराने जबर मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर घरातील सुमारे २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच बँकेचे कोरे धनादेश चोरून नेले. या घटनेमुळे जामगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेत अशोक भीमाण्णा मुळे (वय ६१, रा. जामगाव, ता. माढा) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मुलगा विजयकुमार अशोक मुळे (वय ३०) यांनी माढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजल्यापासून २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान चोरट्याने मुळे यांच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. घरात असलेल्या अशोक मुळे यांच्या डोक्यात कोणत्यातरी घातक हत्याराने जबर मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चोरट्याने घरातील लोखंडी कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि बँकेचे कोरे चेक घेऊन पोबारा केला.
या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप अज्ञात असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने जामगाव परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, घरात घुसून वृद्धाची हत्या करून चोरी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
माढा परिसरात घडफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. कुलूप बंद घराकडे मोर्चा वळवून चोरटे दागिने व रोख रक्कम लंपास करतात. वाडीवस्तीवर शेती साहित्यांसह जनावरे चोरणारी टोळीही कार्यरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी माढा शहरासह परिसरातील नागरिकांतून होत आहे.