Solapur News : जलजीवनच्‍या ठेकेदारांचा ऐन दिवाळीत शिमगा

शंभर कोटी थकले : कामे ठप्प, जिल्‍हा परिषदेकडून १४० कोटी निधीची मागणी
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionpudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : जिल्‍ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत एक हजारांपेक्षा जास्‍त कामे मंजूर आहेत. त्‍यातील शेकडो कामांच्‍या बिले देण्यासाठी शंभर कोटी रुपयांची बिले थकली आहेत. ही बिले देण्यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १४० कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, अद्यापही निधी न आल्‍याने ऐन दिवाळीत जलजीवनच्‍या ठेकेदारांना शिमगा करण्याची वेळ आली आहे.

जलजीवनची जिल्‍ह्यात एक हजारांपेक्षा जास्‍त कामे मंजूर असून, त्‍यातील जवळपास साडेचारशे कामे पूर्ण झाल्‍याची माहिती समोर आली आहे. तर निधीअभावी साडेपाचशेपेक्षा जास्‍त कामे ठेकेदारांनी बंद ठेवली आहेत. ही कामे चालू सुरू करण्यासाठी तसेच पूर्ण झालेल्‍या कामांची बिलासाठी जलजीवन ठेकेदार संघटनाकडून अनेकवेळा मागणी करण्यात आली आहे. मात्र, जिल्‍हा परिषदेकडे निधी उपलब्‍ध होत नसल्‍याने ठेकेदारांतून संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

केंद्र सरकारकडून निधीला ब्रेक

केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या निधीतून जलजीवन मिशनची कामे करण्यात येत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून मागील काही महिन्‍यांपासून जलजीवन मिशनच्‍या निधीला ब्रेक लावण्यात आले आहे. त्‍यामुळे राज्‍य सरकारकडूनही निधी देण्यात आला नाही. त्‍यामुळे ठेकेदार अडचणीत सापडले आहेत.

राज्‍याकडून ७६० कोटींची तरतूद

केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्‍याने जलजीवनची कामे ठप्प आहेत. ही कामे तत्‍काळ सुरू व्‍हावीत, यासाठी राज्‍य शासनाने ७६० कोटी रुपयांच्‍या निधीची तरतूद करण्यात आली असून, लवकरच जिल्‍हा परिषदेला निधी उपलब्‍ध होणार असल्‍याची माहिती समोर आली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण केलेल्‍या कामांची बिले दिवाळीत मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, केंद्र शासनाकडून निधी मिळाला नसल्‍याने बिले रखडली आहे. परंतु राज्‍य शासनाने निधीची तरतूद केली असून, दिवाळीनंतर बिले मिळतील. मात्र, सध्या ठेकेदारांना दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे.
-अरुण तोडकरी, राज्‍य कार्याध्यक्ष, पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.