

सोलापूर : प्रवाशांना प्रसाद म्हणून चिक्कीतून गुंगीचे औषध देऊन दागिने चोरणाऱ्या सराईत महिला गुन्हेगाराला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. गीतादेवी उर्फ मीनादेवी रामनरेश थोरे (वय ५९, रा. कटरा, जि. इटावा, उत्तर प्रदेश) असे सराईत गुन्हेगार महिलेचे नाव आहे.
आंध्र प्रदेशातील गोविंद व्यंकोबा कुमरा (वय ३१) हे पत्नीसह १५ सप्टेंबर रोजी कर्नाटक सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या जनरल बोगीतून कोपरगाव ते मंत्रालय असा प्रवास करत होते. गाडी सोलापूर रेल्वेस्थानकाजवळ येत असताना, या महिलेने प्रसाद म्हणून दिलेली चिक्की खाल्ल्यानंतर पती-पत्नीला गुंगी आली. तिचा फायदा घेत तिने महिलेच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाचे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सापळा रचून तिला ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला. पोउनि शब्बीर तांबोळी हे पुढील तपास करत आहेत.
चार ठाण्यांत गुन्हे दाखल
अटक महिला सराईत गुन्हेगार असून, तिच्यावर छत्रपती संभाजीनगर, कल्याण, दादर आणि मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. साथीदारांचा शोध घेणे, अन्य गुन्ह्यांची उकल करणे आणि तिने यापूर्वी रेल्वेत केलेले चोरीचे दागिने व मोबाईल कुठे विकले याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली आहे.