

सोलापूर : शहरातील सिद्धेश्वर पेठ येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक करीत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 110 ग्रॅम सोन्याचे व 113 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. अनिलकुमार मिस्त्रीलाल राजभर (वय 38, रा. बोदरी, जि. जौनपुर, राज्य उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
शहरातील जि. प. चे शिक्षणाधिकारी कादर राजूमियाँ शेख (वय 50, रा. प्लॉट नंबर 602 सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वर पेठ) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कडीकोंयड्यासह तोडून अज्ञात चोरट्याने 10 तोळे वजनाचे सोन्याचे-दागिने व दहा तोळे वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि.11) सकाळी घडली होती. याबाबत शेख यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिवसा घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली. शहर गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तसेच सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहायक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाची परिसरातील बारकाईने निरीक्षण केले. पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करून संकलित केली. यावेळी एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवर संशय निर्माण झाला.
संशयित इसमाविषयी अधिक माहिती संकलित करताना पोलिसांना संशयित आरोपी हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे कळाले. मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपीला हॉटेल अॅम्बसेडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणार्या रोडवर युनिटी अपार्टमेंट जवळ सापळा लावून पोलिसांनी घरफोडीच्या साहित्यासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला तात्काळ अटक केली.