

सोलापूर : आंतरजिल्हा मोटारसायकली चोरणारा अट्टल मोटारसायकल चोरास ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून आठ लाख 80 हजार रुपयांच्या 15 मोटारसायकली हस्तगत केल्या.
सहा. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांचे पथक पंढरपूर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, अट्टल मोटारसायकल चोर बबन चुनाडे (रा. कराडकर मठाशेजारी, पंढरपूर) हा चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी पंढरपुरातील शिवाजी चौकात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सोलापूर, नाशिक, पुणे, सांगली, अहिल्यानगर, धाराशिव येथून तब्बल 15 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
पंढरपुरात सांगोला बायपास रोडवर चिलारी झाडांच्या मध्ये लपवून ठेवलेल्या सर्व 15 मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बबन चुनाडे याच्यावर महाराष्ट्रात मोटारसायकल चोरीचे तब्बल 100 गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी श्रीकांत गायकवाड, रवी माने, सलीम बागवान, आश्विनी गोटे, विनायक घोरपडे, सूरज रामगुडे, मनोज राठोड, सुनंदा झळके, समीर शेख यांनी पार पाडली.