

सांगोला : रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडावे, तसेच सोनके व चिंचोली तलाव भरून द्यावेत, अशी मागणी आ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत येत्या १० नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजनासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत आ.बाबासाहेब देशमुख यांनी खरीप हंगामातील ढिसाळ पाणी नियोजनावरून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुष्काळी सांगोला तालुक्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी नियोजनातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सांगोला तालुक्यात यंदा भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेती टिकविण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी वेळेत आणि पूर्ण आवर्तन मिळणे आवश्यक आहे.
त्यामुळे रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडण्याची मागणी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्याचबरोबर सोनके व चिंचोली तलाव भरून देण्याची मागणीही त्यांनी बैठकीत ठामपणे मांडली. त्यामुळे सोनके व चिंचोली तलाव भरून देण्याच्या आ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीमुळे या तलावांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
टेंभू-म्हैसाळ योजनेचे आवर्तन १५ डिसेंबरपर्यंत सोडणार
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत शेतीसाठी पाणी मिळावे, यासाठी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीची दखल घेत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टेंभू-म्हैसाळ योजनेचे आवर्तन १५ डिसेंबरपर्यंत सोडण्याचे निर्देश दिले आहेत.