Pandharpur Well Collapse| आंबेतील दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती स्थापन : जिल्हाधिकारी

तब्बल २५ तास बचावकार्य; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
Pandharpur Well Collapse
Pandharpur Well Collapse
Published on: 
Updated on: 

पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील विहीर दुर्घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.

माती व दगडाचा ढिगारा नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, दुर्घटनेमागील तांत्रिक कारणे कोणती, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या काय, या सर्व बाबींची चौकशी समिती करणार आहे, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.

रविवार (दि. १५) सकाळी दहा वाजता आंबे (ता. पंढरपूर) येथे विहीर खोदकाम सुरू असताना माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळला. रविवारी सकाळी साडेदहापासून बचाव कार्याला सुरू होते. कोसळलेला वीस फूट उंचीचा ढिगारा आणि निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती यामुळे बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. एनडीआरएफच्या पथकाने तांत्रिक कौशल्याच्या आधारे मोहीम सुरू ठेवत चारही मृत कामगारांना बाहेर काढले. ही मोहीम तब्बल २५ तासांनंतर पूर्ण झाली. घटनास्थळीच वैद्यकीय पथकाने मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर चारही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

बचाव मोहिमेच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घटनास्थळी थांबून होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही रात्री दोन वाजता आंबे येथे भेट देऊन बचाव मोहिमेची माहिती घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली.

बचावकार्यादरम्यान रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या कामगाराचा, दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता तिसऱ्या कामगाराचा, तर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास चौथ्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. सलग २५ तास शोधमोहीम सुरू होती.

दुर्घटनाग्रस्त विहीर बुजविणार

या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता यादृष्टीने संबंधित विहीर बुजविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.