

सोलापूर : दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. सर्वांनाच पाणी पाणी करण्याची वेळ आली असल्याने उजनी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, त्यास हरताळ फासत उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी अद्यापही विसर्ग सुरूच आहे. धरणाच्या ‘बॅक वाटॅर’मधूनही सिंचनासह चक्क उद्योगांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने साठ्यात झपाट्याने घट होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विसर्ग व उपशामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात गेल्या १८ दिवसांत लक्षणीय घट झाली. १३ सप्टेंबर रोजी ९९.८९ टक्के असलेला जिवंत पाणीसाठा १ ऑक्टोबर रोजी ९०.६५ टक्क्यांवर आला. या कालावधीत धरणातील जिवंत साठ्यात ४.९५ टीएमसीची घट झाली. १ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता घेतलेल्या पाणीपातळीच्या नोंदीनुसार, उजनी धरणाची पाणीपातळी ४९६.४०० मीटर आहे. धरणात ११२.२२ टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी जिवंत साठा ४८.५६ टीएमसी आहे. जिवंत साठ्याची टक्केवारी ९०.६५ टक्के आहे.
सीना-माढा, दहिगाव योजनांसाठी विसर्ग
उजनीतून सध्या पाणीवापर सुरू असून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २१० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचनसाठी ११० क्युसेक, बोगद्यातून ६५० क्युसेक आणि मुख्य कालव्यातून २६५० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत घट होत आहे.