

मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील रस्त्यावर बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याकडे ‘दैनिक पुढारी’ने लक्ष वेधताच, पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. मंगळवेढा पोलिसांनी याठिकाणी धडक कारवाई करत 6 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून, यापुढे ररस्त्यात वाहने लावल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्यावर लहान-मोठी वाहने अस्ताव्यस्त उभी केली जात असल्याने एसटी महामंडळाच्या बससह इतर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. याबाबत स्थानिक नागरिक आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. ही समस्या दै.‘पुढारी’ने बातमीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्यानंतर पोलिस यंत्रणा जागी झाली. मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी या तक्रारीची दखल घेत वाहतूक विभागाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या.
या कारवाईमुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संभाजी यादव, पोलिस कॉन्स्टेबल सूरज साळुंखे, सचिन काळेल आणि ब्रह्मपुरी गावचे पोलिस पाटील प्रशांत पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सहा वाहनांवर कारवाई
वाहतूक शाखेच्या पथकाने ब्रह्मपुरी ते माचणूर रस्त्यावर धाड टाकली. यावेळी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या 6 वाहनांवर ई-चलन मशीनद्वारे 4,500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. केवळ दंड आकारून न थांबता, पोलिसांनी संबंधित वाहन चालक आणि मालकांना कडक शब्दांत तंबी दिली आहे. यापुढे जर रस्त्यावर वाहने लावलेली आढळली, तर केवळ दंड नाही तर थेट कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.