

सोलापूर : मोहोळ वनपरिक्षेत्राच्या वतीने टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) असलेल्या एका कंपनीच्या अचानकपणे करण्यात आलेल्या तपासणीत विविध प्रजातीच्या दहा हजार वृक्षांची बेकायदा तोड केल्याचे आढळून आले. दोन हजार टन वजनाचे एक कोटी किंमतीची बेकायदा वृक्ष तोड करून वन विभागाकडून वाहतूक परवाना न घेता कंपनीने बॉयलरसाठी याचा इंधन म्हणून वापर केल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित कंपनीवर वन विभागाने वन गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीचे संचालक राकेश ईश्वरचंद वर्मा, (रा. फ्लॅट क्र.1001, 1002 कोणार्क बेल्व्हेडियम मुंढवा, पुणे) व सोमनाथ दशरथ महाडीक (देशमुख, रा. टेंभूर्णी, ता. माढा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहोळच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून वनविभागाला मिळालेला माहितीनुसार टेंभुर्णीच्या औद्योगिक वसाहतीतील या कंपनीची अचानकपणे केलेल्या तपासणीत कंपनीच्या बॉयलर परिसरात अवैद्यपणे वृक्षतोड करुन विनापरवाना झाडांची तोड केल्याचे आढळून आले. या तपासणीत कंपनीकडून आंबा, चिंच, जांभूळ, कडुलिंब, शिरस, बाभूळ आणि अन्य मिश्र प्रजातीच्या दहा हजार झाडांचे बेकायदा वृक्षतोड केल्याचेही दिसून आले.
गैर व अनुसूचित वृक्ष प्रजाती आढळून आली. पाहणी केलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त स्वरुपात लाकडाचे लहान लहान तुकडे करून त्याचे ढिग करून ठेवले होते. या लाकडाचे बाजारमूल्य ही एक कोटी असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने काढला आहे. तोडण्यात आलेल्या झाडे हे 8 ते 35 वर्षे किवा त्यापेक्षा जास्त वयोमानाची झाडे आहेत. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने टेंभुर्णीतील ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनपरिमंडळ अधिकारी अविनाश गायकवाड, शुभम धायतडक यांनी केली आहे.