

सोलापूर : बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना विजापूर नाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व मोटारसायकल असा सुमारे १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी (वय ३९, रा. शांतेश्वर गल्ली, इंडी, जि. विजयपूर) हा गावठी पिस्तूल व काडतुसे घेऊन मोटारसायकल क्रमांक केए २८ एचएफ २३३६ वरून विजयपूरहून सोलापूरकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला बुधवार १९ ऑगस्ट रोजी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवीन विजापूर नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पहाटे अडीच वाजता त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली. त्याची अंगझडती घेण्यात आली. यात त्याच्याजवळ पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, दोन मोबाईल व मोटारसायकल मिळून आली. पिस्तूल बाळगण्याचा परवाना नसल्याचे त्याने सांगितले. त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान त्याने पिस्तूल व काडतुसे इंडी येथील मित्र घनश्याम दल्लीचंद जाट (वय २७) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत जाट यास २० ऑगस्ट रोजी इंडी (जि. विजयपूर) येथून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्यास अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.