

सोलापूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने शहरातील बेगम पेठ पोलीस चौकी शेजारी रस्त्याला अडथळा ठरणारे लोणावत यांच्या पत्रा शेडमध्ये असलेल्या सिमेंट गोडाऊनचे आतिक्रमण जेसीबीद्वारे हटवण्यात आले. महापालिका नगर रचना विभाग आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ही संयुक्त कारवाई केली.
महापालिका नगर रचना कार्यालयाकडून अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना कारवाई करण्यासंदर्भात पत्रान्वये सूचित करण्यात आले होते. त्यानुसार आज महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाई हाती घेतली. शहरातील बेगम पेठ पोलीस चौकी शेजारी रस्त्याला अडथळा ठरणारे लोणावत यांचे पत्रा शेडमध्ये असलेले सिमेंटचे गोडाऊन जेसीबीद्वारे हटवण्यात आले.
दरम्यान, परिसरात नागरिकांची गर्दी जमली होती. उन्हाच्या कडाक्यात अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. त्यानंतर मधला मारुती परिसरातही मोहीम राबवण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती
विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.