सोलापूर : पक्ष्यांचा किलबिलाट.. रम्य, नेत्रसुखद हिरवाकंच निसर्ग... सकाळचा हवाहवासा वाटणारा सुखद गारवा... असे तनमन प्रसन्न करणारे वातावरण. त्यातच सर्वप्रकारच्या स्क्रीनपासून मुक्ती, वाचनानंद, वाचनातील विचारांचे आदानप्रदान यामुळे होणारी ज्ञानवृद्धी असे अनेक फायदे असणारा प्रिसिजन बुक क्लबचा रविवारी वाचनाचा यज्ञ हुतात्मा बागेत गेल्या चार महिन्यांपासून अव्याहतपणे सुरू आहे.
प्रिसिजन बुक क्लबमार्फत हुतात्मा बागेमध्ये हे वाचन अभियान प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेत सुरू आहे. या अभिनव उपक्रमामुळे रविवारची सुरुवात खूप रम्य, ज्ञानवृद्धीने होते. अधिकाधिक वाचकांनी, पुस्तकप्रिय व्यक्तींनी सहभाग नोंदवावा, असाच उपक्रम आहे.
कधी टीव्ही तर कधी मोबाईल, कधी टॅब तर कधी लॅपटॉपच्या या जमान्यामध्ये सर्वप्रकारच्या स्क्रीनपासून किमान एक तास तरी आपण दूर राहावे, निसर्ग पाहावा, वाचनातून, संवादातून ज्ञानवृद्धी करावी असा नवा विचार देणारा हा प्रिसिजन बुक क्लबचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये लहानथोर, महिला पुरुष असे कुणीही सहभागी होऊ शकतो. यासाठी काही अट नाही. असायला हवी ती स्क्रीनपासून काही काळासाठी दूर जाण्याची जबरदस्त इच्छाशक्ती अन् रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून आळशीपणाने बेडवर लोळत पडण्यापासून निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची अंतस्थ ऊर्मी.
स्वर्गीय उद्योजक रतन टाटा यांचे मानसपुत्र शंतनू नायडू यांनी या अभिनव उपक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये केली. हळूहळू याचे अनुकरण पुणेकर करू लागले, हल्ली हा उपक्रम सोलापुरताही बाळसं धरू लागला आहे. याला साथ मिळाली आहे ती प्रिसिजन फाऊंडेशनची. प्रिसिजन वाचन अभियानाचाच एक विस्तारित भाग म्हणून मे महिन्याच्या पहिल्या रविवारपासून हा उपक्रम हुतात्मा बागेमध्ये अव्याहतपणे सुरू आहे.
या उपक्रमाविषयी श्रीधर खेडगीकर म्हणाले, झाडाखाली बसून निसर्गाच्या सान्निध्यात पुस्तक वाचणे यात एक आनंद आहे. प्राचीनकाळी ऋषिमुनी झाडाखाली बसून तपश्चर्या करायचे. झाडाखाली, निसर्गाच्या सान्निध्यात एक प्रकारची मानसिक शांतता, एकाग्रता प्राप्त होते. यातून ज्ञानवृद्धीसह मनःशांतीही मिळते.

