Solapur Crime : पतीचा खून; पत्नी आणि प्रियकराला जन्मठेप

अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा लोखंडी पहाराने डोक्यात मारून खून
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पतीचा लोखंडी पहाराने डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश राधिका शिंदे यांनी हा निकाल दिला.

रंजना दादासाहेब पवार (वय ३२, रा. हिवरे, ता. मोहोळ) आणि अमोल ऊर्फ कृष्णा अंगद पांढरे (वय २३, रा. कान्हेरी, ता. मोहोळ) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मृत दादासाहेब हणमंत पवार (वय ३६, रा. हिवरे, ता. मोहोळ) हा रंजना हिचा पती होता.

दादासाहेब पवार हा पत्नी रंजना आणि अमोल पांढरे यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. त्यामुळे दोन्ही आरोपींनी संगनमत करून २६ एप्रिल २०२३ रोजी रात्री दादासाहेब यांचा घराच्या अंगणात झोपेत असताना लोखंडी पहाराने डोक्यात मारून खून केला. त्यानंतर मृतदेह पिकअप वाहनातून नेऊन कॅनाॅलच्या वाहत्या पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. २८ एप्रिल २०२३ रोजी कॅनाॅलमध्ये वाहत आलेला मृतदेह परमेश्वर पिंपरी परिसरातील पाण्याच्या पाईपला अडकलेल्या अवस्थेत आढळला.

मृताच्या काकांनी कपडे, तसेच हातातील लाल-पिवळ्या रंगाच्या गोफावरून मृतदेह दादासाहेब पवार यांचाच असल्याची ओळख पटवली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी विविध पुरावे गोळा केले. त्यामध्ये परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय व न्यायवैज्ञानिक पुरावे, पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज, आरोपीने साक्षीदारासमोर दिलेला कबुली जबाब, तसेच मृतदेह कॅनाॅलमध्ये टाकल्याचा पुरावा यांचा समावेश होता. मृत आणि त्याच्या आईचे डीएनए नमुनेही प्राप्त करण्यात आले होते. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षातर्फे एकूण २५ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी खटला चालविला. त्यांनी गुन्ह्याचा हेतू, परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय व न्यायवैज्ञानिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींनी संगनमताने कट रचल्याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास सुनावण्यात आला. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रदीपसिंह राजपूत, ॲड. माधुरी देशपांडे, ॲड. आनंद कुर्डुकर यांनी काम पाहिले. आरोपींच्या वतीने ॲड. राज पाटील, ॲड. महेश सोलनकर आणि ॲड. स्नेहल राऊत यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.