

मरवडे : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गोवा व तामिळनाडू या राज्यांत हालमत सांप्रादायातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धनगर समाजाचे आराध्य दैवत हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील महालिंगराया व हुन्नूर येथील बिरोबा या गुरू-शिष्यांसह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यंदाच्या वर्षी देशभरात समाधानकारक पाऊस पडल्याने आठ राज्यातून भेटीचा सोहळा पाहण्यासाठी सहा ते सात लाख भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी हजारो टन भंडारा, खारीक, खोबरे, लोकराची उधळण करीत महालिंगरायाच्या नावानं चांगभलं... बिरोबाच्या नावानं चांगभलं... च्या गजराने परिसर दणाणून गेला.
सोमवारी रात्री बारा वाजता मुंडास ( ध्वज ) बांधण्याचा सोहळा पार पाडला. दिवसभर मुंडास ( ध्वज ) पाहून भाविक पुढील वर्षीचा राजकीय व पावसाचा अंदाज बांधत होते. आजच्या मुख्य दिवशी महालिंगराया देवास परंपरेप्रमाणे नैवेद्य जत येथील डफळे संस्थानाकडून दाखवण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी चार वाजता महालिंगराया मंदिरालगत असणाऱ्या ओढ्यात शिष्य महालिंगराया देवाची पालखी मंदीरातून ओढ्यात आल्यानंतर, एका पाठोपाठ एक असे बिरोबा देवाचे वडील जत तालुक्यातील उटगी येथील ब्रह्मलिंग, जत तालुक्यातील सोन्याळ येथील विठ्ठल, महालिंगरायाचा नातू उमरगा तालुक्यातील कसगी येथील ब्रह्मलिंग, चडचण तालुक्यातील शिराढोण येथील शिलवंती व बिरोबा, चडचण
तालुक्यातील जिरंकलगी येथील बिरोबा, विजयपूर तालुक्यातील बिज्जरगी येथील बुळाणसिद्ध व शेवटी महालिंगरायाचे गुरु हुन्नुर येथील बिरोबी या पालख्यांच्या भेटी झाल्या. नगारा-ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगरायाच्या पालखीला भेट देत असताना महालिंगरायाच्या नावानं चांगभलं.. बिरोबाच्या नावानं चांगभलं.. अशा गजरात आकाशात भंडारा, लोकर, खारीक, खोबरे उधळण्यात आल्याने संपूर्ण परिसर व ओढ्यातील पाणी भंडाऱ्याने न्हाऊन निघाले होते. या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी सहा राज्यांतील अंदाजे सहा ते सात लाख भाविकांनी खासगी वाहनासह एस.टी. ने येऊन याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला.
यात्रा कालावधीत आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी पुरेशा प्रसाधनगृहांची सोय नसल्याने मंदीर परिसर व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी जवळ तसेच पालखी सोहळा ज्या ओढ्यात पार पडतो तेथील परिसरात अनेक भाविकांनी प्रात:विधी केल्याने दूर्गंधी पसरली होती. त्यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यात्रा कालावधीत जड वाहने मरवडे - चडचण- विजापूर व उमदी- चडचण- मरवडे वळविण्यात आली होती. तरीपण छुप्या मार्गाने अनेक खाजगी वहाने यात्रेच्या ठिकाणी लावल्याने वाहतूकीची कोंडी झाली होती.
यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा कालावधीत कोणत्याही साथीचे आजार पसरू नये यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, तालुका आरोग्याधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर व सलगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गायकवाड , आरोग्य निरिक्षक चंद्रकांत साळुखे, चिदानंद गुरव ,सरसंबी यांच्या मार्गदर्शनाखाली ५६ आरोग्य कर्मचाऱ्याचे आरोग्य पथक कार्यरत होते.