

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त घरकुलांची कामे सुरू आहेत. ती कामे वेगाने पूर्ण व्हावीत, यासाठी जिल्हा परिषदेकडून वारंवार बैठका, प्रत्यक्ष पाहणी करून कामे पूर्ण करण्यासाठी दबाव वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारी वैतागले असून, ग्रामविकास नव्हे घरकूल विकास असल्याची चर्चा त्यांच्यामध्ये होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सुरू असलेली घरकुले वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बैठका घेऊन सूचना करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचार्यांच्या सातत्याने बैठका घेऊन घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येत असल्याने प्रकल्प संचालक, गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकार्यांसह कर्मचारी वैतागले असून, केव्हा घरकुलांची कामे पूर्ण होणार, याची वाट कर्मचारी पाहत आहेत. मात्र, जिल्ह्यातील घरकुलांची संख्या मोठी असल्याने ती पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.
इतर कामांवर परिणाम
गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांना घरकूल बांधकाम पूर्ण करून घेण्यासह अनेक बरीच विकासात्मक कामे आहेत. मात्र, जिल्हा परिषदेकडून वारंवार घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी बैठक, सूचना येत असल्याने त्याचा इतर कामांवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामसेवकांकडून होत आहेत.
इतर योजना राबविण्यास अडचण
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत बक्षिसे जिंकण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने तयारी सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीचे गुणांकन करून पात्र ग्रामपंचायतीचा अभियानात समावेश केला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतीमध्ये घरकुलांची कामे सुरू आहेत, त्यामुळे इतर सर्व योजना राबविण्यास ग्रामसेवकांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी ग्रामसेवकांकडून होत आहेत.