

बार्शी : महाळाच्या नैवेद्यासाठी कुटुंबासह गावी गेलेल्या एकाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने ५ लाख ५१ हजार रुपयांचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.४० दरम्यान बसवेश्वर कॉलनी, वाणी प्लॉट, आगळगाव रोड येथे घडली. याप्रकरणी मंगेश मारुती भडंगे (वय ३३, रा. बसवेश्वर कॉलनी, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जबाबात म्हटले आहे की, मंगेश भडंगे हे आई मंगल आणि वडिलांसह एकत्र राहतात. दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ते मूळगाव तेरखेडा येथे महाळ असल्याने घराला आणि मेन गेटला कुलूप लावून गेले होते. दुपारी ३.४० वाजता परत आले असता मेन गेट उघडून आत गेल्यावर घराचा दरवाजा उघड्या अवस्थेत आणि कुलूप तुटलेले दिसले. आत सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. उजव्या बेडरूममधील लोखंडी व फर्निचरचे कपाट, तिजोरी फोडलेली होती. डाव्या बेडरूममधील कपाटही उघडून फाईल, कपडे विखुरलेले होते.
चोरीस गेलेल्या ऐवजात ४८ ग्रॅमचे ३ लाख ३६ हजारांचे गंठण मंगळसूत्र, १० ग्रॅमचे ७० हजारांचे मणी मंगळसूत्र, ५ ग्रॅमच्या ३५ हजारांच्या तीन अंगठ्या, २.५ ग्रॅमचे २० हजारांचे कानातले फुले आणि ९० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे वाणी प्लॉट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बार्शी शहर पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साठे हे करत आहेत.