

सोलापूर : गेल्या आठवडाभरांपासून सोलापूरचा पारा सातत्याने वाढत असून, रविवारी 42.9 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. सकाळपासून प्रचंड उकाड्याने नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहिल्या. मात्र, सायंकाळी पाच वाजल्यानंतर वातावरणात बदल होऊन वादळ वारा सुटला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला.
यंदा 10 एप्रिलपासून सोलापूरच्या तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या वर राहिला आहे. 16 एप्रिल रोजी 43.4 अंश इतकी उच्चांकी नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वोच्च तापमान ठरले. याकाळात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने कोरडे तप्त वारे होते. दि. 14 एप्रिल रोजी 43.2, दि. 15 रोजी 43.3, दि. 16 रोजी 43.4, दि. 17 रोजी 42.2, दि. 18 रोजी 42.4, रोजी 19 रोजी 42.9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले.
रविवारी सकाळी अक्षय्य तृतीया आणि महात्मा बसवेश्वर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीसाठी बाहेर पडलेले नागरिक कडक ऊन, तप्त झळा, हवेतील कोरडेपणा यामुळे घामेघूम झाले होते. त्यांना सायंकाळी दिलासा मिळाला. पाच वाजल्यानंतर वातावरणात बदल होत काही वेळात हवेत गारवा निर्माण झाला. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी परिसरात पाऊस पडला.