

सोलापूर ः सोलापूरच्या नागरिकांना अतित्रासदायक ठरणार्या डीजेवर गणेशोत्सवापुरती तरी बंदी आली. त्यामुळे यंदाची गणेशोत्सवाची मिरवणूक डीजेविरहीत असणार आहे. न्यायालयानेदेखील त्याच्यावर शिक्कामोर्तब करीत नागरिकांना दिलासा दिला आहे. सोलापुरात डीजेबंदी व्हावी, यासाठी सर्वप्रथम दै. ‘पुढारी’ने बातम्यांच्या माध्यमांतून आवाज उठविला होता.
डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सोलापुरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. या त्रासाला कंटाळलेल्या सोलापूरकरांचा आवाज बनला दै. ‘पुढारी’. सोलापुरात ‘डीजेबंदी झाली पाहिजे’ या मागणीसाठी दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम चळवळ सुरू केली. डीजेबंदी होण्यासाठी बातम्यांच्या माध्यमातून जागृती केली. डीजेला पर्यायही दिले. यामुळे सर्वसामान्य सोलापूरकरांमध्ये जागृती झाली. सजग सोलापूरकर, डीजे विरोधी कृती समितीने पुढे येऊन डीजे बंदीसाठी आंदोलने केली. याचा परिणाम म्हणजे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहर आणि जिल्ह्यात डीजे बंदीचा आदेश काढला. गणेशोत्सवापुरता का होईना, डीजे बंदी झाल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या आदेशाविरोधात सोलापूर न्यायालयात याचिका दाखल झाली. बोटांवर मोजण्या इतक्या डीजे चालकांसाठी दाखल झालेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावत डीजे बंदी कायम ठेवत नागरिकांना दिलासा दिला. डीजे बंदी झाल्याने यंदाची गणेशोत्सव मिरवणूक ऐतिहासिक ठरणार आहे. लेझिम, झांज, टिपरी, ढोल-ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या आणि खेळांच्या निनादात मिरवणुका पार पडणार आहेत. ते बघण्यासाठीही यंदा दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी होईल, याचे कारण म्हणजे मिरवणुकीत डीजेचा कर्णकर्कश आवाज नसेल.