

सोलापूर : हवामान खात्याचा अंदाज तंतोतत खरा ठरवत, सोलापूर शहर परिसरात मुसळधार पावसाने तुफान बॅटिंग केली. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हा पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. यामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. नाले सफाई चोख केल्याची दवंडी पिटणार्या महापालिकेच्या वल्गना खोट्या ठरवत, नाल्याशेजारी असलेल्या अनेक रहिवासी नगरांसह भवानी पेठ, हंडे प्लॉट, नई जिंदगी, मराठा वस्ती येथील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.
आज सकाळपासूनच हवेत उष्मा होता. पाऊस येईलच, असे प्रत्येकजण म्हणत होता. अखेर दुपारी साडेचारच्या सुमारास अक्षरशः मुसळधार पाऊस सुरू झाला. दीर्घकाळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहराच्या सखल भागातील रस्ते पूर्णतः जलमय झाले. दुचाकी वाटेतच बंद पडू लागल्या तर ऑटोरिक्षासह चारचाकीही कसरतीने चालवाव्या लागल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौपाड, नवी पेठ, उमा नगरी, लोभा मास्तर चाळसह प्रभाग क्रमांक तीन मधील भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील लेंडकी नाला भरून अनेक घरांत पाणी घुसले. त्यातच नेहमीप्रमाणे बुधवारचे कारण पुढे करून दिवसभर विजेचा लपंडाव पाहायला मिळाला. घरांत शिरलेली पाणी, जलमय रस्ते, वीजबत्ती गुल यामुळे पावसाळ्यापूर्वीच्या पावसात सोलापूरकरांची अक्षरशः दाणादाण झाली.
शहरातील रस्ते जलमय झाल्याने दुचाकी चारचाकी वाहनांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. सुमारे तीन तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस झाला. मुंबई प्रादेशिक हवामन केंद्राने राज्यात 21 ते 24 मे दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवीत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तो अंदाज आज तंतोतंत खरा ठरल्याचे सोलापूरकांना अनुभवास आले.
होटगी रोड, विजापूर रोड, जुळे सोलापूर, सोरेगांव, शेळगी, मधला मारुती, चौपाड, नवी पेठ, बसस्थानकासह अन्य भागांतील रस्त्यांवर गुडघ्याभर पाणी साचल्याने वाहनांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावरील पाण्यात वाहने बंद पडून अनेकांची पंचायत झाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावरील चेंबर तुंबल्याने पिण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 8.4 मिमी पाऊस झाल्याचे हवामान खात्याकडे नोंद झाली. यामुळे तापमानात कमालीचे घट झाली. बुधवारी कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
सोलापूर शहरांमध्ये गेली दोन दिवस झाले अवकाळी पावसाची दमदार हजेरी लावली आहे. यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल झाली. आपत्कालीन यंत्रणांनी योग्य अशी नाले सफाई न केल्याने नाल्या शेजारी असलेल्या रहिवासी वस्त्यांसह भवानी पेठ, हंडे प्लॉट, नई जिंदगी येथील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच अनेक झोपडपट्ट्यांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पावसाळ्यापूर्वीच्या पावसातच महापालिकेची आपत्तकालीन यंत्राणा फेल गेल्याचा आरोप सोलापूरकर करत आहेत.
भवानी पेठ भागातील माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भवानी पेठ परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे सांगत आपत्कालीन यंत्रणेची मदत मागितली. हंडे प्लॉट परिसरात देखील काही घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. नई जिंदगी भागात नाल्या शेजारील असलेल्या रहिवासी नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरले. पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाकडून नाले सफाईची सुरुवात केली आहे. मात्र अद्याप नाले सफाईचे काम पूर्ण झाले नाही, तसेच जे काम झाले आहे ते व्यवस्थित झाले नसल्यानेच अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करत आहेत.