

सोलापूर : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भीमा आणि सीना नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या श्री संगमेश्वर आणि श्री हरिहरेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. रविवारी सुट्टी असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी जमली होती. बहुमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागासह सोलापूर जिल्ह्यातून हजारो भाविक दररोज येत आहेत.
सोलापूरपासून ४० कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर असलेले हे ठिकाण धार्मिक आणि निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथील हरिहरेश्वर मंदिरातील बहुमुखी शिवलिंग हे जगातील एकमेव असल्याचे मानले जाते. या एकाच अखंड काळ्या पाषाणावर ३५९ शिवमुखे कोरलेली असून प्रत्येक मुखावरील भाव वेगवेगळे आहेत. हे शिवलिंग ४ मीटर परिघाचे आणि सुमारे ४ टन वजनाचे आहे. ११ व्या शतकात चालुक्य काळात बांधलेले हे मंदिर १९९५-९६ मध्ये उत्खननातून प्रकाशात आले होते.
श्रावण महिन्यात येथे श्री संगमेश्वर मंदिर परिसर सुधारणा समितीच्या वतीने दररोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि मकर संक्रांतीला येथे मोठी यात्रा भरते. तसेच सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो तेव्हा मंदिरातील शिवलिंगावर पहाटेची सूर्यकिरणे पडण्याचा किरणोत्सव सोहळादेखील येथे पाहायला मिळतो.
संगमेश्वर मंदिर हे त्रिकुट मंदिर असून गर्भगृहात शिवलिंग, उजवीकडे मुरलीधर श्रीकृष्णाची मूर्ती आणि मधोमध गणेशाची मूर्ती आहे. हरि आणि हर यांची एकत्र पूजा होणारे हे जिल्ह्यातील एकमेव मंदिर आहे. या ठिकाणी सभामंडपात शके ९४०, इसवी सन १०१८ मधील मराठीतील आद्य शिलालेख देखील आहे. भाविकांच्या सोयीसाठी समितीने पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्था केली आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची संख्या दुप्पट होत असल्याचे हणमंत बगले यांनी सांगितले. श्रावणात येथील दर्शनासाठी कर्नाटकासह महाराष्ट्रातील भाविकांची संख्या मोठी असते.