

कासेगाव : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी , उळे व कासेगाव परिसरातील काही भागात रविवारी दुपारनंतर हवामानात अचानक बदल होऊन गारांचा पाऊस झाला. दुपारी सुमारे तीन वाजल्यापासून आकाशात ढग दाटून आले होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढत गारांसह पावसास सुरुवात झाली.
सुमारे अर्धा तास पडलेल्या या अवकाळी पावसामुळे काढणीसाठी आलेल्या ज्वारी, गहू व मका आदी पिकांवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी फळभाज्या व भाजीपाला पिकांनाही फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कडबा भिजल्याने चाऱ्यांचा प्रश्न
शेतकरी शेतीसोबत पशुपालन हा जोडधंदा करत असल्याने या पावसाचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावरही झाला आहे. विशेषतः ज्वारीचा कडबा भिजला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके आडवी पडल्याचेही दिसून आले. अचानक बदललेल्या वातावरणामुळे काढणीच्या कामात अडथळा निर्माण झाला. संबंधित विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.