

सोलापूर : ग्रामीण पोलिसदलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत सराईत मोटारसायकल चोरास अटक केली. त्याच्याकडून सात लाख ७० हजार रुपये किमतीच्या २२ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना सहा. पोलिस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकास दिल्या. त्यानुसार तपास करताना त्यांना अकलूज शहरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका चोरट्याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे नामदेव बबन चुनाडी (रा. नातेपुते, ता. माळशिरस) याचा शोध घेतला. चौकशीत त्याने मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केला असता, त्याने मोहाळ, टेंभुर्णी, अक्कलकोट, सोलापूर शहर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील विविध ठिकाणांहून २१ मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. चोरीच्या दुचाकींपैकी काही दुचाकी त्याने विक्री केल्याचीही माहिती तपासात समोर आली. नामदेव चुनाडी याच्याकडून गणेश ऊर्फ नाना साबळे (रा. राजतनगर, अकलूज) आणि तुषार चव्हाण (रा. राजतनगर, अकलूज) यांनी चोरीच्या मोटारसायकली खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. या तिघांकडून चोरीच्या एकूण २२ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सात लाख ७० हजार रुपये आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, प्रेरणा कट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, रवी माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, सुनंदा झळके, अनवर अत्तार, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, सागर ढोरे पाटील यांनी पार पाडली.