

सोलापूर : कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील बारदाण्याच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये दोन दुकाने व दुकानातील अडीच कोटी रुपयांचा बारदाना व इतर फर्निचर जळून खाक झाले. शनिवारी पहाटे तीन ते चार दरम्यान ही आग लागली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा सेल हॉल जवळ कांदा बारदाना तसेच इतर पिशव्या विक्री करण्याची दुकाने आहेत. यामधील इरफान तेली यांचे सुलतान ट्रेडर्स या गाळा नंबर 12 हे बारदाना विक्री करणारे दुकान आहे. शनिवारी पहाटे या दुकानाला आग लागली, त्यामध्ये जवळपास दहाहून अधिक प्रकारचे बारदाना, ताडपत्री, सुतळी, प्लास्टिक बॅग, यासह लोखंडी फ्लावर स्टॉल या लगतच्या दुकानांमधील फर्निचर, खुर्च्या व इतर साहित्य खाक झाले. या आगीमध्ये जवळपास दोन्ही मिळून तीन कोटी पर्यंत नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच सभापती दिलीप माने, सुरक्षा अधिकारी एस वाघमारे, सचिव अतुलसिंह रजपूत यांनी धाव घेतली.