

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महानगरपालिकेस मंजूर झालेल्या 38 घंटागाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या 25 घंटागाड्यांचे लोकार्पण गुरुवारी (दि. 2 ऑक्टोबर) इंद्रभुवन येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले.
पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेस एकूण 38 घंटागाड्यांची मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित गाड्यांची खरेदी लवकरच पूर्ण होणार आहे. नवीन घंटागाड्यांमुळे शहरातील कचरा संकलन व्यवस्थेस गती मिळेल. नागरिकांना वेळेत व सुटसुटीत सेवा मिळेल. सोलापूर हे स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याला आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे आदी उपस्थित होते.