

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांची ताकद कळाली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशा भावना माझ्यासह अनेकांच्या आहेत. विरोधकांना 100 ही मते पडणार नाहीत, अशा शब्दात नाव न घेता खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टोला लगावला.
पालकमंत्री गोरे हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसकडे पाच, एमआयएमकडे आठ नगरसेवक आहेत. विरोधकाची ताकद किती आहे, हे गेल्या तीन महिन्यांपूर्वी निवडणुकीत दिसून आले आहे, असा टोला लगावला.
भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, ही वस्तुस्थिती आहे. सोलापूरला मुंबईवरून येण्यासाठी एकच विमान असल्यामुळे माजी आ. राजेंद्र राऊत आणि मी एकाच विमानामध्ये सोलापूरला आलो. त्यामुळे यातून वेगळी राजकीय चर्चा करायची आवश्यकता नाही, असे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
दरम्यान, कॉक्रोच पार्टीवरून विचारलेल्या प्रश्नाला सोशल मीडियावर अशा प्रकारचे पोस्ट व्हायरल केले जातात. त्यामुळे त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे सुरू आहेत, असे गोरे म्हणाले. राज्यात कुठेही पेट्रोल, डिझेल यासारख्या इंधनाचा तुटवडा नाही. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, याबाबतची माहितीही कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.