

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री साखर कारखान्यांकडील थकीत ऊसबिलासाठी शेतकऱ्यांनी अठरा दिवस ठिय्या आंदोलन केले होते. त्याला यश आले असून, सोमवारी (दि.२९) पासून शेतकऱ्यांना ऊसबिले मिळणार आहे. त्याची जबाबदारी राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने (एनसीएलटी) घेतली आहे.
आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत होते. मात्र, शुक्रवारी (दि.२६) जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे आणि शेतकरी आंदोलन नेता ॲड. अमोल पाटील यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत सोमवारीपासून शेतकऱ्यांना चेकद्वारे उसाची थकीत रक्कम दिली जाणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याची माहिती ॲड. पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणने शेतकऱ्यांची बिले देण्याची जबाबदारी घेतली असून, ही कंपनी दिवाळखोरीत निघालेले साखर कारखाने, कंपन्याची जबाबदारी घेऊन संबंधित लोकांची बिले देण्याची काम करते. त्यामुळे या कंपनीवर आंदोलक शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला असून, सोमवारची वाट ते पाहत आहेत.
आ. कल्याणशेट्टी, जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी यशस्वी
थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी गोकुळ कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दुर्लक्ष केले. मात्र, आ. सचिन कल्याणशेट्टी व जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शेतकऱ्यांनी बिले देण्याची जबाबदारी घेतली. ती जबाबदारी यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.