Solapur news : सोलापुरातून झेपावले विमान

गोवा विमानसेवेला प्रारंभ; ऑगस्टमध्ये मुंबईसाठीही हवाई प्रवास
Solapur news
सोलापूर : सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा प्रारंभ करताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, विमानतळ प्राधिकरणचे संचालक चंद्रेश वंजारा, फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ मनोज चाको, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आ. अभिजित पाटील आदी.
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूरकरांसाठी सोमवार ऐतिहासिक दिवस ठरला. येथील विमानतळावरून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला गेला. यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

विमानतळ प्राधिकरण आयोजित सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. प्रणिती शिंदे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. देवेंद्र कोठे, आ. उत्तम जानकर, आ. अभिजित पाटील, आ. राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, माजी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी आ. राजेंद्र राऊत, माजी आ. राम सातपुते, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, विमानतळ प्राधिकरणचे संचालक चंद्रेश वंजारा, फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ मनोज चाको यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये राज्यमंत्री मोहोळ व पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच, फ्लाय नाईन्टी वन कंपनीच्या विमानाला राज्यमंत्री मोहोळ व पालकमंत्री गोरे यांनी झेंडा दाखवून सोमवारी (दि. 6) सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा प्रारंभ केला. 41 प्रवाशांसह विमान गोव्याकडे मार्गस्थ होऊन दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी गोव्यात पोहचले. ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. सन 2014 च्या आधी देशात 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 162 विमानतळ विकसित केले आहे, असे मंत्री मोहोळ यांनी सांगितले.

पालकमंत्री गोरे यांनी विमानसेवा शुभारंभाचा आजचा हा दिवस सोलापूरसाठी आनंदाचा दिवस असल्याचे सांगून सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे. ‘मोदी है तो मुमकीन है’ असे सांगत विमानतळाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले, आणि ते काम पूर्णत्वास गेल्याचे भाषणात सांगितले. पहिल्या टप्प्यात सोलापुरातून गोव्यासाठी सेवा सुरू होत आहे. गोव्यातून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता सोलापुरातून मुंबईसाठी विमान सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सोलापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक चंद्रेश वंजारा यांनी प्रास्ताविकात सोलापूर विमानतळासाठी करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.

डीवॉल सिस्टीम, नाईट लँडिंगची सुविधा

खराब वातावरणामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईवरून सोलापुरच्या विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्याला येता आले नाही. सोलापूर विमानतळावर वातावरण स्पष्टतेबाबत तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही यासाठी डीवॉल सिस्टीम बसवणे तसेच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करणे या अनुषंगाने पुढील काळात काम केले जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

तिरुपती, बंगळूर, हैदराबाद सेवाही लवकरच

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरहून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर विमानतळावरून आता केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत तिरुपती, हैदराबाद व बंगळूरसाठीही विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार असल्याची घोषणाही यावेळी मोहोळ यांनी केले.

मुंबईसाठी असणार स्टार एअर लाईन्सची सेवा

सोलापूर विमानतळावरून लवकरच मुंबईसाठी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी भाषणात सांगितले. तरी विमानतळ परिसरात आगामी विमानसेवेविषयी फ्लेक्स उभारण्यात आले होते. मुंबईसाठी लवकरच सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार, या मजकुरासह त्यावर स्टार एअर लाईन्सचाही उल्लेख होता. त्यामुळे लवकरच सोलापुरातून सुरू होणारी मुंबई विमानसेवा ही स्टार लाईन्सची असणार असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news