

सोलापूर : सोलापूर ते गोव्यासाठी येत्या 9 जून रोजी ‘फ्लाय 91’ या कंपनीचा विमान येथील प्रवाशांना घेऊन उडणार आहे. यासाठी कंपनीकडून तिकिटाचे बुकिंग मंगळवारी (दि. 27) पासून सुरू झाले. प्रवाशांकडून बुकिंगला प्रतिसाद मिळत आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस राहील. 2475 रुपये व त्यावर 5 टक्के जीएसटी असे मिळून 2599 रुपये तिकीट दर असणार आहे.
विमान सेवा पुरवणार्या ‘फ्लाय 91’ या कंपनीकडून सोलापूरसह देशातील एकूण आठ शहरांना विमान सेवा दिली जाणार आहे. याची घोषणाही या कंपनीकडून करण्यात आला आहे. पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग या शहरांचा यात समावेश आहे.
फ्लाय 91 कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून बुकिंगला मंगळवारी सोलापूरच्या सेवेसाठी सुरुवात झाली. नैऋत्य महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा शहर असल्याने येतील गारमेंटच्या व्यापार्यांना याचा फायदा होईल. शिवाय, अन्य ठिकाणच्या प्रवाशांना धार्मिक पर्यटनासाठी या विमान सेवेचा फायदा होईल. आठवड्यातील चार दिवसात दोन दिवस सकाळी तर इतर दोन दिवस संध्याकाळच्या सत्रात ही सेवा असणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आदी ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी बाहेरील भक्तांना ही विमानसेवा सोयीची ठरणार आहे.
सोमवार, शुक्रवार, शनिवार व रविवार अशी चार दिवस विमान सेवा सुरू राहणार आहे. सोमवार ते शुक्रवार गोव्यातून सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण होऊन 8 वाजून 30 मिनिटांनी सोलापूर विमानतळावर आगमन होईल. परत 8 वाजून 50 मिनिटांनी उड्डाण होऊन गोव्याला सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी पोहोचणार आहे. तर शनिवार व रविवारी गोव्यातून सायंकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी उड्डाण होऊन सोलापुरातील विमानतळावर 5 वाजून 10 मिनिटांनी आगमन होईल. सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी सोलापुरातून उड्डाण होऊन गोव्याला 6 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.