Solapur Municipal Corporation : जीबीच्या अजेंड्यावर २७ विषय

पाणीपुरवठ्याच्या १५ टँकर खरेदीसह भूसंपादन व नाट्यगृह उभारणीचा समावेश
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationPudhari Photo
Published on: 
Updated on: 

सोलापूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर एकूण २७ विषय असून शहरातील विकासकामे, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर सभेत निर्णय होणार आहे.

या सभेतील महत्त्वाच्या प्रस्तावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ७.२० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा विषय आहे. तसेच शहरातील जलवितरण व्यवस्था सुधारणे आणि नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक खासगी जागेचे भूसंपादन करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सुंदरम नगर येथे नाट्यगृह उभारणीसाठी २२ कोटी ४६ लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या कामाला मान्यता देण्याचा विषयही सभेत आहे. याशिवाय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत महापालिकेच्या सात मराठी शाळांच्या विकासासाठी निधी खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.

बुधवार पेठेतील जीर्ण सफाई कर्मचारी वसाहतीच्या जागेवर नवीन इमारती उभारणे आणि पात्र सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सदनिका देण्याबाबत शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा विषयही महत्त्वाचा आहे. याशिवाय विविध प्रभागांतील रस्ते, एलईडी पथदिवे, समाजमंदिर, उद्यान परिसरातील सुधारणा, पाणीपुरवठ्यासाठी टँकर खरेदी, अल्पसंख्याक व मागासवर्गीय कल्याणकारी योजनांतील कामे, तसेच महापालिकेच्या मिनी शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या भाडेकरारासंबंधीचे प्रस्ताव चर्चेला येणार आहेत.

पाच महत्त्वाचे विषय

महिलांसाठी एमएस-सीआयटी व एआय प्रशिक्षणासाठी १ कोटी ३९ लाख ६५ हजार रुपयांचा प्रस्ताव आहे.

पाणीपुरवठ्यासाठी १५ टँकर खरेदीसाठी २ कोटी ३३ लाख ५० हजार रुपयांची तरतूद.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानातून सात मराठी शाळांमधील विविध विकासकामे करण्यासाठी २ कोटी ५० लाखांची तरतूद.

मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ८९ लाख ९८ हजार ७४१ रुपये निधीतून धोत्रीकर वस्ती येथे समाजमंदिर, थोबडे वस्ती येथे रस्ता आणि तुळजापूर नाका हनुमान मूर्ती परिसरात सुधारणा करण्यात येणार.

सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानात ६५ लाख ६३ हजार ४०४ रुपये निधीतून सहारा नगर, काजल नगर परिसरात दिवाबत्ती आणि विविध प्रभागांत नवीन इलेक्ट्रिक पोल व एलईडी फिटिंगची कामे करण्यात येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.