

सोलापूर : सोलापूर शहरात दहा दिवसांपासून सुरू असलेल्या श्रद्धा आणि भक्तीच्या आनंद सोहळ्याची शनिवार, दि. 6 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यंदा लाडक्या बाप्पाला निरोप देताना काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत दैनिक ‘पुुढारी’ने आवाज उठवलेल्या डीजे बंदीला चांगले यश मिळाल्याचे पाहावयास मिळाले. कर्णकर्कश आवाजाला फाटा देत लेझीम, झांज, ढोल, ताशा अशा पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप देत सोलापूरकरांनी महाराष्ट्रात नवा इतिहास घडवला. सुमारे वीस तास मिरवणूक चालली.
शहरात पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, विडी घरकूल मध्यवर्ती महामंडळ, सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळ, लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ, लोकमान्य मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ आणि नीलमनगर मध्यवर्ती महामंडळाच्या अधिपत्याखाली सुमारे 1200च्या आसपास सार्वजनिक मंडळांनी बाप्पांची स्थापना केली होती. शनिवार, दि.6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी दिवशी दीडशे ते दोनशे मंडळांनी विसर्जन मिरवणुका काढत आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप दिला.
सोलापूरातील मिरवणूक तब्बल वीस तास चालली. 140 वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक आजोबा गणपतीचे विसर्जन रविवार, दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 7.33 वाजता सिध्देेश्वर मंदिरा जवळील विष्णू घाटावर प्रतिकात्मक सुपारी विसर्जन करून मिरवणुकीची सांगता झाली.
पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीत एकूण 22 मंडळांनी सहभाग नोंदवला. सर्व मंडळे पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढत असल्याचे दिसून आले. या मिरवणुकीत वारकरी भजनी मंडळाचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मिरवणुकीदरम्यान रिंगण सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. अनेक मंडळांची मिरवणूक महिला भजन पथकासह निघाली होती. विडी घरकूल मध्यवर्ती महामंडळ अंतर्गत एकूण 60 मंडळांची स्थापना करण्यात आली होती. तर मिरवणुकीमध्ये एकूण 15 मंडळांनी सहभाग नोंदवला. वरद गणपती, फेटा गणपती, लक्ष्मी राज गणपती, भाग्यनगर गणेशोत्सव मंडळ यांचे मिरवणुकीतील लेझीम व ढोल पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीत 39 मंडळांनी सहभाग नोंदवला. सकाळी अकरा वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्य व लेझीम, झांज, ढोल, टिपर्या वाद्यासह निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एकूण 120 मंडळे सहभागी झाली होती. लेझीम, मलखांब, झांज, टिपरी, दांडपट्टा हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. धर्मवीर संभाजी तलाव येथे विसर्जन मिरवणुकांचा समारोप झाला.
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ अंतर्गत 130 मंडळांची नोंदणी झाली होती. तर 59 मंडळांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. हलगी, पथनाट्य आणि देखावे आदींचे सादरीकरण तसेच पारंपरिक वाद्यांमध्ये व सामाजिक संदेश देणारी मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरली. रुक्माई मानाचा गणपतीची पूजा पोलिस आयुक्त एम. राजकुमार आणि महापालिकेच्या आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला.
लोकमान्य मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीत 50 मंडळांचा सहभाग होता. पत्रा तालीम येथून दुपारी मिरवणुकीला प्रारंभ झाला. सर्वच मिरवणुकांमध्ये मंडळांनी केवळ पारंपरिक वाद्य व लेझीमचे मर्दानी डाव सादर करून सर्वांची मने जिंकली.
नीलमनगर मध्यवर्ती महामंडळाच्या मिरवणुकीला सायंकाळी 6 वाजता रामप्पा चिवडशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करून प्रारंभ झाला. या मिरवणुकीत एकूण 78 मंडळांनी सहभाग नोंदवला. डीजे मुक्त तसेच बॅनर मुक्त मिरवणुकीने सर्वांची मने जिंकली.