

सोलापूर : पारंपरिक संबळ, ताशांचा निनाद, ढोल-झांज पथकांची साथ आणि लेझीमचे रंगतदार डाव अशा उत्साही वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीचा पायंडा यंदाही सोलापूरकरांनी कायम ठेवला. पारंपरिक संबळ, ताशांचा निनाद, ढोल-झांज पथकांची साथ आणि लेझीमचे रंगतदार डाव अशा उत्साही वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शहरातील गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सुमारे १८ तास विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू होता.
अखंड हिंदुस्तानातील प्रथम मानाचे गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजोबा गणपतीची मिरवणूक शनिवारी (दि. २६) सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी साडेसातच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाटावर आजोबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शहरातील आठ मध्यवर्ती गणेश मंडळांच्या अंतर्गत १२०० हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील घराघरातील अडीच लाखांहून अधिक घरगुती गणरायांनाही भक्तिभावाने निरोप देण्यात आला.