

सोलापूर : सलग तीन दिवस सुट्टी आल्यांमुळे सिद्धेश्वर गड्डा यात्रेत आनंद लुटण्यासाठी प्रचंड गर्दी झाली असून, विद्युत दिव्यांनी सजलेले गगनचुंबी आकाश पाळणे, डिस्नेलँड, जलपरीचा शो, पन्नालाल गाढव, खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासाठी बच्चेकंपनी नागरिकांच्या गर्दीने होम मैदान परिसर फुलून गेला आहे.
शनिवारी (दि. 24) आणि रविवारी (दि.25), सोमवारी (दि.26) अशी सलग शासकीय सुट्टी जुळून आल्याने होम मैदानावरील गड्डा यात्रेत सहकुटूंब सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तर बच्चेकंपनीसाठी आकर्षण असलेल्या गड्डा यात्रेत यंदा एक नवा आणि अनोखा प्रयोग पाहायला मिळत आहे. सोलापुरात प्रथमच ‘जलपरी शो’चे आयोजन करण्यात आले असून, या आगळ्या-वेगळ्या शोने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाण्याने भरलेल्या विशेष काचेच्या टँकमध्ये जलपरीचे सजीव सादरीकरण, तिची जलक्रीडा, नृत्य व कलात्मक हालचाली पाहण्यासाठी यात्रेत मोठी गर्दी होत आहे.
जलपरीचा हा शो पाहण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता असून, संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षकांची संख्या वाढताना दिसत आहे. या शोमुळे गड्डा यात्रेला आधुनिकतेची आणि मनोरंजनाची नवी झळाळी मिळाली आहे. विशेषतः लहान मुले जलपरीला प्रत्यक्ष पाहून भारावून जात असून, पालकही आपल्या कुटुंबासह हा शो पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत. मोबाईल कॅमेऱ्यात क्षण टिपण्यासाठी नागरिकांची धडपडही पाहायला मिळत आहे. यात्रेत दरवर्षी झोपाळे, खेळणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि पारंपरिक करमणूक असते; मात्र यंदा जलपरी शोमुळे यात्रेचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. आयोजकांच्या मते, नवीन आणि सुरक्षित मनोरंजन देण्याच्या उद्देशाने हा शो सोलापुरात प्रथमच आणण्यात आला आहे.