

कुर्डूवाडी : फनरेप फनगेम चक्री नावाचे बनावट अॅप तयार करुन एजंटांकरवी याचा प्रसार करून फिर्यादीसह एकूण सात जणांची सुमारे एक कोटी 48 लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या फसवणुकीत 21 आरोपींची नावे समोर आली आहेत. या एजंट आरोपींना बॅलन्स सोडल्यावर 20 टक्के कमिशन मिळत होते.
आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. ही घटना लऊळ (ता. माढा) गावासह कुर्डूवाडी, बार्शी शहरासह परिसरात घडली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी बालाजी विष्णू खारे (रा. लऊळ) यांनी 12 फेब्रुवारीला फनरेप चक्री गेममध्ये फसवणूक झाल्याची फिर्याद कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांनी दाखल करून घेत चार आरोपींना अटक केली होती.
यात गुन्हा दाखल झाला ही महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. गुन्हे शाखेने आजपर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपींनी दोन वर्षापासून बनावट अॅप तयार करुन एकूण सात गुंतवणूकदारांना फसवल्याचे समोर आले. यामध्ये फसवणुकीतील रक्कम व आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातील दोन आरोपी बार्शी व उर्वरित आरोपी कुर्डूवाडी शहर व परिसरातील आहेत. गुन्ह्याचे स्वरूप व्यापक असून याबाबत बाहेरील जिल्ह्यात जाऊन पुढील तपास पोलीस करणार आहेत. गुन्ह्यातील आरोपी व त्याची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
मागील आठवड्यात बारलोणी (ता. माढा) येथील एका युवकाने चक्री जुगारात एक कोटी पेक्षा जास्त रकमेला फसवल्यामुळे त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने जवळील 56 तोळे सोने तसेच बागायत तीन एकर जमीन या चक्रीच्या नादात विकून एक कोटी पेक्षा जास्त रक्कम चक्रीत तो हरला होता. त्याला ज्यांनी फसवले त्या एजंटाची तो आता पोलिसात तक्रार करणार आहे.
नितीन पाटमस, रणजित सुतार, वैभव सुतार, अमित शिंदे, स्वप्निल नागटिळक, राहुल चौथे ऊर्फ बच्चू भिसे, सूरज किरवे, फनरेप फनगेम कंपनीचे मालक, फनरेप फनगेम कंपनीचे डिस्ट्रीब्युटर, अमरदीप पंचिरे, सौरभ ऊर्फ बप्पा देवकते, सागर तरंगे, अरबाज दाळवाले, साहिल दाळवाले, अर्जुन गायकवाड, अरबाज पठाण, सागर मोरे, मिलन गोफणे, सोनू राजगे (सर्व रा. कुर्डूवाडी, ता. माढा), योगेश गाडे, गणेश देवकते (दोघे रा. ता. बार्शी) अशी एकूण 21 आरोपींची नावे आहेत.