

सोलापूर : माजी खासदार, सहकारमहर्षी, पद्मशाली समाजाचे धुरीण, विणकररत्न गंगाधरपंत सिद्रामप्पा कुचन (वय 91) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. सोलापुरात सहकार क्षेत्राचे जाळे विणण्यात तसेच पूर्व भागाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या कुचन यांच्या निधनाने सोलापूरवर शोककळा पसरली आहे.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुचन यांना काही दिवसांपूर्वी एका सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे पाच वाजता त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पक्षात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पूर्व भागातील जडणघडण, वैभवाचे साक्षीदार असलेल्या एका पर्वाचा अंत झाला आहे. सकाळी नऊ वाजता सुमारास त्यांचे पार्थिव पद्मनगर येथील निवासस्थानी आणण्यात आणले.
सायंकाळी पाचपर्यंत राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर तसेच समाजबांधवांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे 15 वर्षांपूर्वी कुचन यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या निधनानंतर मंगळवारी देहदान करण्यात आले. मंगळवारी त्यांचे पार्थिव पद्मनगर येथील निवासस्थानापासून नजीकच असलेल्या त्यांचे पुत्र लक्ष्मीनारायण कुचन यांच्या निवासस्थानी विसाव्यासाठी नेण्यात आले. त्यानंतर देहदानासंदर्भात आवश्यक सोपस्कर पूर्ण केल्यावर त्यांचे पार्थिव अश्विनी मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले.
भेटीसाठी शरद पवारांना करावे लागले होते वेटिंग
गंगाधरपंत कुचन हे वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध होते, हे सर्वश्रुत आहे. याशिवाय ते रविवारी संपूर्ण दिवस आपल्या खासगी जीवनासाठी राखून ठेवत असत. एके दिवशी रविवारी सोलापूर दौऱ्यावर असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गंगाधरपंत कुचन यांना भेटायचे होते; मात्र कुचन हे रविवारी कोणालाच भेटत नसल्याने शरद पवारांना नाईलाजास्तव मुक्काम करून दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कुचन यांना भेटावे लागले होते. सोलापूरच्या राजकारणात या गोष्टीची अधूनमधून चर्चा केली जाते, हे विशेष.