

सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून शहरात दोन उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या उड्डाणपुलांमध्ये बाधित होणार्या मिळकतींच्या भूसंपादनासाठी 106 कोटींची गरज आहे. यामध्ये फेज एकसाठी 70 कोटी तर फेज दोनसाठी 35 कोटी लागणार आहेत. महापालिका प्रशासनाकडे 109 कोटी रुपये असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
जुना पुना नाका ते पत्रकार भवन हे 5.45 किलोमीटर अंतर फेज वन तर जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला हे पाच किलोमीटर अंतर फेज टू असे दोन उड्डाणपूल होणार आहेत. उड्डाणपुलांमध्ये एकूण 133 मिळकती बाधित होणार आहेत. यामध्ये शासकीय, निमशासकीय मिळकतींचा समावेश आहे. शासकीय आणि निमशासकीय अशा 13 विभागांनी अद्याप जागा ताब्यात दिल्या नाहीत. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून दोन उड्डाणपुलांचे काम रखडले होते.
पहिल्या टप्प्यातील फेज वनची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑवर्डही निघाले आहेत. यासाठी 70 कोटी रूपये लागणार आहे. निवाड्याचा एक वाद शिल्लक आहे. तो सध्या विभागिय आयुक्तांकडे आहे. 10 कोटींचा निवडा आहे. तर पहिल्या टप्प्यातील जागा संपादन केली आहे. मात्र, पैसे घेतले नाहीत असे तब्बल 35 कोटी रुपये कोर्टात जमा केले आहेत. दुसर्या टप्प्यातील फेज दोनची भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी 35 कोटी लागणार आहेत.
एस.टी. महामंडळ, रेल्वे, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र विद्युत महामंडळ, पोस्ट विभाग, वस्त्रोद्योग महामंडळ, बीएसएनएल विभाग आणि पोलिस विभागाच्या जागा बाधित होणार आहेत. या सर्व जागा शासनाच्या आहेत. त्यांना पर्यायी जागा दिली आहे. त्यामुळे मोबदला देण्याचा प्रश्न येत नाही. इमारतींचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे भूसंपदानाचे लाखो रुपये वाचल्याचेही आयुक्तांनी सांगितले.