

सोलापूर : सीना नदीतील पाण्याचा विसर्ग कमी झाला असला तरी पुराची दाहकता कमी झालेली नाही. माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या पाच तालुक्यांतील सीना नदीकाठच्या अनेक गावांत तीन दिवसांनंतरही पाणी उतरलेले नाही. पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद शाळा तसेच इतर सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रे उभारली आहेत. वडकबाळ पुलाच्या बाजूला महामार्गावर पाणी असल्याने सोलापूर-विजापूर महामार्ग अजूनही बंद ठेवण्यात आला आहे.
अनेक गावकर्यांना घरदार सोडावे लागले. चार हजाराहून अधिक व्यक्तींना पुराच्या पाण्यातून वाचविण्यात आले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. निवारा केंद्रांत त्यांची सोय केली आहे. पूर ओसरत असला तरी पुराची दाहकता मात्र कायम आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील 431 शाळांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.
सीना कोळेगाव, खासापुरी, भोगावती आणि चांदणी मधून सध्या सीनेत 55 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या नऊ टीम अजूनही मदत कार्यात सक्रिय आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराचे पथक पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी काम करीत आहे. उत्तर, दक्षिण तालुक्यातील अनेक गावात बोटीच्या सहाय्याने मदत पोहोचवण्यात आली. तीन दिवसांपासून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
नेत्यांची पाहणी, शेतकर्यांच्या हाती काहीच नाही...
सीना नदीला आलेल्या पुराची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरूवारी पुन्हा पूरग्रस्त भागाची पाहणी केली. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजित पाटील यांनी माढा आणि करमाळा येथे पाहणी केली. सोलापुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकर्यांमधून होत असताना राज्य शासनाने केवळ दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून हेक्टरी मदत जाहीर केलेली नाही.
एसटी सेवा विस्कळीत तर रेल्वे सेवा पूर्वपदावर
महापुरामुळे दोन दिवसांपासून अनेक मार्गांवरील एसटी रद्द करण्यात आल्या. महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. विजापूर, दक्षिण सोलापुरातील गावे, बार्शी, माढा, सांगोला, मोहोळ या मार्गावरील अनेक एसटी बंद आहे. दक्षिण भारतातून येणार्या व सोलापूर विभागातून धावणार्या रेल्वेगाड्या मिरज व लातूरमार्गे वळवल्या होत्या. त्या सर्व एक्स्प्रेस गाड्या गुरुवार (दि. 25) पासून नियमित मार्गावरून सुरू झाल्या. सिद्धेसश्वर, वंदे भारत व हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत.
भीमेला पूर
दक्षिणमधील कुडलसंगम येथे सीना नदी भीमेला मिळते. सीनेतील प्रचंड विसर्ग, उजनी धरणातून सोडलेले पाणी तसेच कर्नाटकातील ओढ्यातून येणारे पाणी यामुळे भीमा नदीला अक्कलकोट तालुक्यात पूर आला आहे. 13 गावांना फटका बसला आहे. काही गावात आणि वस्त्यांमध्ये भीमेचे पाणी शिरल्याने शेतीचेही नुकसान झाले.