

सोलापूर : बहुप्रतीक्षित अशा सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते बंगळूरसाठीची स्टार एअर कंपनीची विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियातून दिली. या सेवेसाठी शनिवार, दि. 20 पासून तिकीट बुकिंग सुरू होत आहे.
होटगी रोडवरील विमानतळावरून ही विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळूरला जलद गतीने पोहोचता येणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे खूप छान सोय होणार असल्याचे मंत्री मोहोळ यांनी म्हटले आहे. दरम्यान, 8 जून रोजी सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सुरू झाली. ही सेवा आठवड्यातून चार दिवस सुरू असते. लवकरच आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा सुरू करण्याची तयारी फ्लाय 91 या कंपनीने सुरू केली आहे.
मुंबईसाठी व्हीजीएफ मंजूर
दोन्ही विमानसेवांचे बुकिंग 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीजीएफ मंजूर केल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. उडान योजनेत समावेश होईपर्यंत सोलापूर मुंबईसाठी व्हीजीएफ सुविधेचा विमान कंपन्यांना सवलत मिळणार आहे. व्हीजीएफ म्हणजे वायबिलिटी गॅप फंडिंग. हे एक प्रकारचे आर्थिक सहाय्य आहे, जे सरकारकडून खासगी कंपन्यांना दिले जाते. जेव्हा अशा कंपन्या सार्वजनिक सेवा किंवा पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रकल्प राबवतात आणि त्या प्रकल्पातून लगेच नफा मिळणे शक्य नसते. पूर्ण तिकिटे विकली गेली नाहीत तर त्याची भरपाई राज्य सरकार अर्थसाह्य देऊन करते.
सोलापूर-मुंबई-सोलापूर
सोलापूर-मुंबई : प्रस्थान
दुपारी 12.55 वाजता
मुंबई-सोलापूर : प्रस्थान
दुपारी 2.45 वाजता
(हा साधारण दीड तासाचा विमान प्रवास असेल)
बंगळूर-सोलापूर-बंगळूर
बंगळूर-सोलापूर : प्रस्थान सकाळी 11.10 वाजता
सोलापूर-बंगळूर : प्रस्थान दुपारी 4.15 वाजता
(हा साधारण पावणेदोन तासांचा प्रवास असेल)