

केम : करमाळा तालुक्यातील केम येथे श्री ऊत्तरेश्वर देवस्थानचे हेमांड पंथी मंदिर आहे. या देवस्थानला फार मोठा इतिहास आहे. या मंदिराशेजारी पुरातन क्षेमकुंड आहे. आता याला बारव म्हणतात. याच केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरातील बारवतील शेकडो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. मासे कसे मृत्यूमुखी पडले, याला जबाबदार कोण याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षा चव्हाण यांनी केली आहे.
सोमवारी सकाळी या बारवमध्ये शेकडो मासे मृत्यूमुखी पडून वर आले होते. भाविकांना ते दर्शनासाठी आल्यावर दिसले. सोमवार व देवस्थान अन्न छत्राचा वर्धापण दिन असल्याने भाविकांनी गदीं केली होती. भाविक बारवतील मृत्यूमुखी पडलेल्या माशांकडे पाहून हळहळ व्यक्त करीत होते.
याबाबत देवस्थान कमिटीचे सचिव मनोज सोलापूरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, या बारवमध्ये असणारे शेतकरी खरडून पाणी काढतात. त्यांना सांगितले आहे पाणी खाली गेले आहे काढू नका. दुसरे कारण म्हणजे पौर्णिमेला कावडया मंदिरात धार घालण्यासाठी येतात त्याचा गुलाल पाण्यात पडल्याने हे मासे मृत्युमुखी पडले असतील, असा अंदाजही मनोज सोलापूरे यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत कावडीवाले कुंडलिक तळेकर व सचिन तळेकर यांनी सांगितले की, कावडया मंदिरात धार घालण्यासाठी आणल्या होत्या. परंतु कावडयावर गुलाल ऊधळला तो गुलाल बारवमध्ये गेला नाही आमच्याकडे व्हिडीओ आहेत.
आता हे मासे मृत्युमुखी पडले याला जबाबदार कोण याची चौकशी व्हावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. यासाठी पाण्याचे योग्य नियोजन व्हावे अशी मागणीही त्यांनी केली.