Solapur FDA Action: एफडीएची धास्ती कुठे आहे?

शहरात मावा-गुटख्याची खुलेआम विक्री
FDA
FDA
Published on
Updated on

सोलापूर : जून-जुलै महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने गुटखा आणि मावा विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम राबवत विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडले होते. कारवाईच्या भीतीने अनेकांनी पानटपऱ्या बंद ठेवण्यास पसंती दिली होती. मात्र, अवघ्या ३५ ते ४० दिवसांत परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली असून शहरातील अनेक भागांत गुटखा आणि माव्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एफडीएच्या कारवाईची धास्ती कमी झाली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आसरा चौक, बेगम पेठ पोलिस चौकी परिसर, सात रस्ता ते रेल्वे स्टेशन मार्ग, मौलाली चौक, नवी पेठ यासह शहरातील विविध भागांतील पानटपऱ्यांवर प्रतिबंधित पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. तुकडा सुपारीचा साठा करून काही पानटपरी चालक जागेवरच मावा तयार करून विक्री करीत आहेत. काही माव्यात गांजाचे पाणी मिसळले जात असल्याचा दावा मावा खाणाऱ्यांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, मावा विक्रीतून सोलापूर शहरात दरमहा सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कारवाईनंतरही विक्रेत्यांचे धाडस पुन्हा वाढले कसे, हा प्रश्न गंभीर आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, विभागाच्या पथकांकडून एक दिवसाआड कारवाया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मात्र प्रत्यक्षात अनेक भागांत खुलेआम सुरू असलेली विक्री या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. त्यामुळे विभागाने केवळ कारवाईची आकडेवारी न दाखवता शहरातील मावा-गुटख्याच्या मुळावर घाव घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून एक दिवसाआड मावा आणि गुटख्याच्या विक्रीविरोधात कारवाया सुरूच आहेत. प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरातील ज्या भागांत अशा प्रकारे खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती मिळत आहे, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
- साहेबराव देसाई (सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news