

सोलापूर : ‘सैराट’ चित्रपटातील कलाकार अरबाज शेखने नोबेल हॉस्पिटलच्या मेडिकलवर रुग्णांची लूट केल्याचा आरोप केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी सकाळी नोबेल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल शॉपची तपासणी करण्यात आली. यावेळी मुदत संपलेल्या औषधांसह काही त्रुटी आढळल्यामुळे हे मेडिकल सील करण्यात आले असून, या दुकानातून तपासणीसाठी काही नमुने ताब्यात घेतल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अरुण गोडसे यांनी दिली.
‘सैराट’फेम कलाकार अरबाज शेख ऊर्फ सल्या यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी सोलापुरातील पोलिस मुख्यालयजवळील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर हॉस्पिटलमधील मेडिकलकडून रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप करत अरबाजने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तसेच राज्याचे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अन्न- औषध प्रशासनाने कारवाई केली.
सोलापुरात नियम धाब्यावर बसवून खासगी हॉस्पिटल्सकडून रुग्णांची लूट सुरूच असल्याचा गंभीर आरोप होत आहे. नागरिकांची तक्रार असूनही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची मुभा न देता त्याच हॉस्पिटलमधूनच औषधे खरेदी करण्याचा आग्रह धरला जात होता. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना विनाकारण आर्थिक ताण सहन करावा लागतो. या कारवाईमुळे रुग्णालयातील कारभार समोर आला आहे.