

बार्शी : आधीच पाऊस-पाण्याची कमतरता आणि दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या बार्शी तालुक्यातील बळीराजावर आता चोरट्यांचे नवे संकट ओढवले आहे. धामणगाव येथील तब्बल ३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील विजेच्या केबल वायर, स्टार्टर आणि पाणबुडी मोटार चोरट्यांनी एकाच रात्रीत लंपास केल्या. या घटनेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धामणगाव दु. हद्दीतील नागझरी नदीवरून शेतकऱ्यांनी सोयाबीन व ऊस या पिकांना पाणी देण्यासाठी विहिरींवरून मोटारी व वीज केबल जोडल्या आहेत. चोरट्यांनी शेतात प्रवेश करत ही चोरी केली. सकाळी फिर्यादी रोहित दत्तात्रय जाधव मोटार सुरू करण्यास गेले असता मोटार चालू झाली नाही. त्यांनी विहिरीवर जाऊन पाहिले असता मोटारीकडे जाणारी वायर चोरीला गेल्याचे दिसले.
गावातील पोलिस पाटील आणि इतर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाहणी केली असता, संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील व सौरऊर्जेवरील तांब्याच्या वायरी कापून नेल्याचे दिसून आले. रोहित जाधव, समाधान सावळकर, नागनाथ सावळकर, दादा भोसले, हनुमंत ढेकणे, सर्जापूर वॉटर सप्लायसह सुमारे ३४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रोहित जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला असून, पोलिस हवालदार भोरे हे तपास करत आहेत.
६० हजारांचा ऐवज लंपास
धामणगाव हद्दीतील डीपीवरून ४०७ मीटर केबल, ५ एच.पी. क्षमतेची पाणबुडी मोटार व स्टार्टर किंमत रु. ३९,०९५ तसेच सर्जापूर डीपीवरून २४८ मीटर केबल किंमत रु. २१,०८० असा एकूण सुमारे ६०,१७५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे.