Solapur News: उभ्या सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्‍टर

अनियमित पावसाने शेतकरी संकटात : पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
Solapur News: उभ्या सोयाबीनवर फिरविला ट्रॅक्‍टर
Published on
Updated on

सोलापूर : पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पाऊस पडत नसल्‍याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्‍या उडीद, मूग, सोयाबीनसह इतर उभ्या पिकांवर ट्रॅक्‍टर फिरविल्‍याचे चित्र जिल्‍ह्यात दिसत आहे.

अपेक्षित पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्‍या. त्‍यासाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च केला. मात्र, पाऊस न पडल्‍याने पिके करपली असून, त्‍या पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्‍याने हवालदिल झाला असून, शेतकऱ्यांना उत्पादनातून पेरणीचा खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विशेषतः सोयाबीन, उडीद पिकाला मोठा फटका बसला आहे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांच्‍या डोळ्यांतून अश्रू वाहत असून, तत्‍काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पाच एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर चालवताना मनाला अतिशय दुःख झाले. महिने-महिने मेहनत करून जपलेले उभे पीक डोळ्यांसमोर नष्ट केले. गावातील अनेक शेतकऱ्यांचीही अशीच परिस्थिती आहे. पिकासाठी केलेला बियाणे व खताचा खर्चही निघणार नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाची मदत जाहीर करावी.
- पंडित बादोले, शेतकरी, घोळसगाव

नुकसानीबाबत सरसकट मदत देण्याची मागणी

नुकसानग्रस्त भागाची प्रशासनाने तातडीने पाहणी करून प्रत्यक्ष शेतावर पंचनामे करावेत. शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news