

गुळवंचीः उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे येथे तलावात बैलासह बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. अंकुश काशीनाथ सिरसट (वय ५५ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गुढी पाडवा निमित्ताने आपल्या बैलजोडीसह सिद्धनाथ कारखाना मागील तळ्यावर धुण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बैलगाडी तळ्याच्या मधोमध गेली. बैलगाडी मध्ये स्वतः शेतकरी असल्याने ते देखील बैलासह पाण्यात बुडाले. तलावाच्या मधोमध जाऊन गाडी पाण्यात पलटी झाल्याची शक्यता आहे. ही घटना आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन शेतकरी सिरसट व बैलांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी आपल्या एका बैलासह पाण्यात बुडाला होता. एका बैलास वाचवण्यात यश आले परंतु शेतकऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला .घटनेची माहिती तिर्हे गावचे पोलीस पाटील यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिली. घटनास्थळी मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस उपनिरीक्षक यांनी भेट दिली. सिरसट कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
अंकुश सिरसट हे कुटुंबप्रमुख होते. आपल्या दोन बैलाच्या साह्याने इतर शेतकऱ्यांच्या शेतात कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सिरसट यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे छत्र हरपले आहे.