

सोलापूर : परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीत नवे प्रयोग करण्याचा मार्ग तालुक्यातील सारोळे येथील शेतकरी सूर्यकांत गाटे यांनी स्वीकारला आहे. त्यांनी १५ एकर क्षेत्रावर ‘गोदावरी’ तूर वाणाची लागवड करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पीक जोपासण्याचा प्रयोग केला आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल घेत बदनापूर कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
कमी पावसाच्या परिस्थितीत तूर पीक घेणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान असते. अशा वेळी पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरतो. हीच बाब लक्षात घेऊन गाटे यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारला. कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथे विकसित करण्यात आलेल्या ‘गोदावरी’ या सुधारित तूर वाणाची त्यांनी १५ एकरांत लागवड केली आहे. मर्यादित पाण्यात पीक जोपासण्याबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादनवाढीची संधी निर्माण होऊ शकते, या उद्देशाने त्यांनी हा प्रयोग हाती घेतला आहे.
दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील शास्त्रज्ञांच्या पथकाने या तूर प्रक्षेत्राला भेट दिली. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक पाटील, रोगशास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप आणि शास्त्रज्ञ डॉ. विष्णू गीते यांनी पिकाची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव अतुल सराफ, सचिन भोजने, प्रदीप साळुंखे, बबन हेडे, उत्तम गाटे,शशिकांत गाटे,, यांच्यासह विविध शेतकरी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जगताप यांनी तूर पिकावरील विविध रोगांची लक्षणे आणि त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. गीते यांनी सुधारित वाणांची वैशिष्ट्ये सांगितली, तर डॉ. पाटील यांनी लागवड तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले.पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर पडून बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा गाटे यांचा प्रयत्न महत्त्वाचा ठरत आहे. १५ एकरांवरील या प्रयोगातून मिळणारे उत्पादन आणि अनुभव आगामी काळात परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.