

सोलापूर : विवाहासाठी इच्छुक व्यक्तींना लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा विजापूर नाका पोलिसांनी पर्दाफाश केला. सोलापुरातील एका तरुणाचे लग्न लावून त्याच्या घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याचा तपास करुन पोलिसांनी पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातून सहा जणांना अटक केली.
विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, १८ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित व्यक्तींनी संगनमत करून फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एजंट ज्योती धनंजय लोंढे, एजंट सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनीता सुनील वाघमारे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे यांची नावे नमूद आहेत.
सूरज संजय पवार (वय ३१, रा. सैफूल, विजापूर रोड, सोलापूर) याने फिर्याद दिली होती. बोगस मॅट्रोमनी ॲपवरुन त्याचे लग्न जुळवण्यासाठी संशयित आरोपींनी त्याच्याकडून वेळोवेळी दोन लाख १७ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याचे लग्न योगिता दत्तात्रय सूर्यवंशी हिच्यासोबत करुन दिले. योगिता ही सासरी आल्यानंतर तिला मासिक पाळी आली आहे असा बहाणा करुन तिने एकत्र येण्यास नकार दिला. त्यानंतर घरातील रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची माहिती घेतली. सूरज हा बहिणीला सोडायला पंढरपूरला गेला असता घरातून एक लाख रुपये रोख व दीड तोळ्याचे दागिने घेऊन ती पसार झाली.
याप्रकरणी विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. पुणे, जालना आणि सोलापूर जिल्ह्यांत पथके पाठवून आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणात एजंट ज्योती धनंजय लोंढे, एजंट सचिन शिंदे, योगिता दत्तात्रय सूर्यवंशी, सुनीता सुनील दाभाडे, दत्तात्रय सूर्यवंशी आणि कैलास शिंदे यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सुशांत वराळे यांच्या नेतृत्वात सहा. पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, संतोष काजळे, अप्पा पवार, रश्मी जाधव, गणेश शिर्के, सनी राठोड, श्रीरंग काशिद, रमेश कोर्सेगाव, राजू पवार, संतोष चानकोटी, स्वाती भोसले यांनी पार पाडली.