

सोलापूर : प्रियकराला कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी सामूहिक अत्याचाराची दिलेली तक्रार बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी तरुणीसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली. प्रतिभा बाबुराव सनके (वय 25) आणि तिचा प्रियकर समीर चांदसाब शेख (28, दोघेही राहणार हत्तुरे वस्ती) अशी त्यांची नावे आहेत.
समीर शेख याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून, 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला होता. या निकालामुळे अडचणीत आलेल्या समीरला वाचवण्यासाठी आणि मूळ प्रकरणातील फिर्यादीवर दबाव आणण्यासाठी या दोघांनी 18 मार्च रोजी अत्याचाराचा बनाव रचला. प्रतिभाने डायल 112 वर कॉल करून चार जणांनी अत्याचार केल्याची खोटी माहिती दिली होती. पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन (सीडीआर) आणि वैद्यकीय अहवालांची कसून चौकशी केली. तांत्रिक तपासात घटनास्थळी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच तरुणीनेे गुन्ह्याची कबुली दिली.