

सोलापूर : गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. दोन ते सात ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १२८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ११९ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये २१ वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे ६६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस विभागाच्या समन्वयाने अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत दाखल झालेल्या १२८ गुन्ह्यांपैकी १२२ गुन्ह्यांमध्ये आरोपी निष्पन्न झाले असून सहा गुन्हे बेवारस स्वरूपाचे आहेत. कारवाईदरम्यान ११९ आरोपींना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या २१ वाहनांमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
या मोहिमेत अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. अवैध मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या प्रमाणातील रसायन, हातभट्टी दारू तसेच देशी व विदेशी मद्य जप्त करण्यात आले. केवळ तयार दारूच्या विक्रीवर कारवाई न करता अवैध दारू निर्मितीची केंद्रे उद्ध्वस्त करण्यावर विभागाने भर दिला.
दोन ऑक्टोंबर रोजी बार्शी परिसरात कारवाई करत तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. देशी व विदेशी मद्य तसेच बिअरचा साठा जप्त करण्यात आला. तीन ऑक्टोबर रोजी कुंभारी तांडा परिसरात कारवाईत चार गुन्हे दाखल करण्यात आले. चार आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात रसायन व हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. सहा ऑक्टोबर रोजी माळशिरस परिसरात दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत देशी दारूसह हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला. सात ऑक्टोबर रोजी मुळेगाव तांडा परिसरात अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर कारवाई केली. यात आठ गुन्हे दाखल करून सात आरोपींना अटक करण्यात आली. त्याच दिवशी सांगोला तालुका परिसरात कारवाईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले.