Solapur Bribe Case : रोजगार हमीच्या विहिरीला ४० हजार लाचेची मागणी

ग्रामसेवकावर कारवाईसाठी पिंपळखुटे ग्रामस्थांचे पंचायत समितीसमोर उपोषण
Solapur Bribe Case : रोजगार हमीच्या विहिरीला ४० हजार लाचेची मागणी
Published on: 
Updated on: 

कुर्डूवाडी : माढा तालुक्यामध्ये रोजगार हमीतील विहीरीचे बिल जर काढायचे असेल तर चाळीस हजार रुपये लाच द्यावी लागते, पैसे दिले नाही तर मंजूर विहिरीचे बिल काढले जात नाही याच्या निषेधार्थ पिंपळखुटे (ता. माढा) येथील तानाजी नागनाथ कचरे व इतरांनी ग्रामसेवकाविरुध्द कारवाईसाठी तालुका पंचायत समिती समोर उपोषण सुरु केले आहे.

रोजगार हमीच्या विहिरीमधून शेतकऱ्याला विहीर मिळते. याचा लाभ शेतकऱ्याला आयुष्यभर होत असतो परंतु झारीतील शुक्राचार्य बनलेले अधिकारी मात्र शेतकऱ्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये एका विहिरीला बिल काढण्यासाठी मागतात. सुरुवातीला त्या शेतकऱ्याची विहीर मंजूर केली जाते, थोडे बिल काढले जाते मात्र नंतरचे बिल काढण्यासाठी त्याला एका विहिरीला ४० ते ५० हजार रुपये मागितली जाते. शेतकऱ्याने् पैसे दिले नाही तर त्याचे पुढील सर्व बिल काढले जात नाही.

तुम्ही काम जेसीबी मशीनने केले आहे. हे काम मशीनने चालत नाही, मजूराने काम करायचे असते अशा अनेक त्रुटी ते विहीर मालकाला सांगतात व त्याचे बिल काढत नाहीत. तसेच घरकुलासाठी हेच ग्रामसेवक गरिबाकडून १० हजार रुपये घेतात. अशा भ्रष्ट ग्रामसेवकावर चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी म्हणून तानाजी कचरे यांनी उपोषण आरंभले आहे. यावेळी त्यांच्यासोबत बालाजी ढगे, सिद्धनाथ कचरे, नागेश पाटील, विजय वाघमारे, बाळासाहेब बोडरे, लक्ष्मण ढवळे, संजय चव्हाण, रविकिरण पाटील, सदाशिव टोणपे उपोषणाला बसलेे आहेत.

विधानसभेतही उपस्थित झाला विहिरीचा मुद्दा

रोजगार हमीतील विहिरीला ४० हजार रुपये शेतकऱ्याकडून घेतले जातात. या विरोधात आ. अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता तसेच अरुण जगताप यांनी नागपूर येथील मुख्य कार्यालयात याची तक्रार केली होती; मात्र भ्रष्टाचाराचे पाणी झिरपायच काही बंद झाले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.