Solapur News | पात्र मतदारांचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे : शीतल तेली-उगले

अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर रोजी होणार प्रसिद्ध
Solapur News | पात्र मतदारांचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे : शीतल तेली-उगले
Published on
Updated on

सोलापूर : एसआयआरचे काम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून करावे. पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत समाविष्ट होईल, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करावे व दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एसआयआर अंतर्गत सर्व मतदान नोंदणी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तेली-उगले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर आदी उपस्थित होते. तेली-उगले म्हणाल्या की, प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र आणि नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे.

संबंधितांना सुनावणीच्या नोटिसा बजावताना उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांचा प्रभावी वापर करावा. आवश्यकतेनुसार व्हॉट्सॲप संदेशाचाही वापर करून संबंधितांपर्यंत सूचना पोहोचवाव्यात. तसेच एसआयआर अंतर्गत कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची तातडीने स्थापना करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. बल्कमध्ये अर्ज स्वीकारू नयेत. फॉर्म क्रमांक ७ व ८ चा गैरवापर होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळताना संबंधित मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करूनच आवश्यक ती कार्यवाही करावी, असे तेली-उगले यांनी स्पष्ट केले.

शीतल तेली-उगले यांनी सोलापूर उत्तर तहसील कार्यालय तसेच सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रास भेट देऊन विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह इतर १३ राज्यांमध्ये एसआयआर कार्यक्रम घेतला आहे. जिल्ह्याच्या यादीत प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे, असे आवाहन शीतल तेली-उगले यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news